Monday, 12 June 2017

*येतील चिमण पाखरं'*

*येतील चिमण पाखरं'*

26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट    घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।

No comments:

Post a Comment