Sunday, 7 October 2018

मुलांना काय घडवताय

*मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?*

माझ्याकडे एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचाही आत्मविश्वास नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला, जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.

बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात, पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणात किंवा कॉलेज जीवनात मिळालेले नसतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात, ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फाटक्या सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात; असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे. गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्य सुखात करू, स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत: कोणतीही शक्ती न उरलेल्या व आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तीचे आहे.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २-३ हजारात व्हायचे, आज तो खर्च ३० – ३५ हजारात गेला. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट, मॅगी, केक, स्कूल बस, घरी परत आल्यावर हातात जेवण, पुस्तके व गाईड्स, क्लासेस, पॅरेंट मीटिंग, लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती, पालकही अभ्यास घेतात, मुलांना वार्षिक सहल, गृहपाठ, प्रोजेक्ट, अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसं मुंबईत गर्दीतून माणूस पळत राहतो. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार, हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही. उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते.

पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला; त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने, वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना माहीत आहे का? जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते; पण त्या कोंबडीला हे माहित नसते, की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही.
http://m.facebook.com/MarathiVichar9
याउलट मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी, फाटलेली, मित्रांची किंवा भावाची वापरली. शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक, मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची.

कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक. एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या, दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्याला जावे, मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा. अशी मुलं पुढे होतात गरुड... कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात; पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

No comments:

Post a Comment