महात्मा बसवेश्वर
💐💐
यांचा जन्म सन ११०५ या साली झाला. महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला होता. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला होता.
महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन,धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहे. मराठी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान केलं आहे.बाराव्या शतकात भारताचे समाजजीवन हे अंध:कारमय झाले होते.अनेक रूढी,अंधश्रद्धा यांनी समाजपुरुष त्रस्त झालेला होता.बहुदेवता उपासना, कर्मकांड, अंधश्रद्धा, पुरोहित वर्गाची मतांधता, पाप-पुण्याची दहशत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, विषमता, कामकरी-कष्टकरी वर्गाची पिळवणूक, स्त्री दास्यत्व इत्यादींनी भारतीय समाजमन बेजार झाले होते, क्षतिग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत भारतीय समाजपुरुषाला उभे करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी करून दाखवले होते. त्यासाठी त्यांना तत्कालीन समाजसत्तेशी, राजसत्तेशी प्रचंड संघर्ष करावा लागला.
महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकावर जसा पडला, तसाच ” महाराष्ट्रावरही ” पडला होता. वारकरी आणि महानुभाव सम्प्रदायांच्या विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा व आचार धर्माचा सूक्ष्म विचार केल्यास या प्रभावाची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. धर्म प्रबोधन, धर्माचा पुनर्विचार व समाज प्रबोधन यांचा अपूर्व समन्वय महात्मा बसवेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं जीवन व त्यांचं कार्य होते . यातून भारतीय संस्कृतीत आगळ्या बसवयुगाचा उदय व विकास झाले होते. भक्तिचळवळीला एक नवं वळण मिळालं, एक वेगळं अधिष्ठान प्राप्त झाले होते.
“माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होत असतो”.
महात्मा बसवेश्वरांना परिवर्तन हे व्यक्तीच्या अंत:करणांतून घडवून आणायचे होते. त्यासाठी एक नवी जीवन पद्धती त्यांनी दिली. जेथे शोषण नाही, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ असा कुठलाही भेदाभेद नाही, कुठल्याही प्रकारची विषमता नाही, जाती-जमाती भेद नाही, कर्मकांड नाही, अशा प्रकारची जीवन पद्धत महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून अस्तित्वात आणून दाखवली. म्हणूनच महात्मा बसवेश्वरांना दक्षिणेतील बुद्ध म्हणून आदराने गौरवण्यात येते.
महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र लक्षात घेतलं की, महाराष्ट्राशीही त्यांचा किती घनिष्ट संबंध होता, याची कल्पना येते. ते महापुरुष होते. इ.स.ना च्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते.बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करत होते. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होते.इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, “कर्म हेच कैलास (काय कवे कैलास )” या विचाराचा विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणले होते.
साम्राज्य जरी चालुक्यवंशीय सम्राट बिज्जलाचे असले तरी लोकांच्या हृदयांवर साम्राज्य महात्मा बसवेश्वरांचेच होते. ख-या अर्थाने ते तत्कालीन समाजाचे हृदयसम्राट होते. वर्णव्यवस्थेला त्यांनी प्रखर विरोध केला होता. मूर्तीपूजेला विरोध करताना ते आपल्या वचनातून प्रतिपादन करत होते.
‘दगडामातीचे देव नाही सत्य,
धातू झाड अनित्य देव ते काय?
सेतूबंध आणि काशी रामेश्वर,
निव्वळ भूमीभार देव ते काय?
तिरुपती-केदार-गोकर्ण-श्री शैल्य,
तिथे वसे वैफल्य देव ते काय?
आपणा-आपण जाणणेची थोर,
मी कोण सत्वर जाणोनी घ्यावा,
कुडल संगमदेव साक्ष एक यास,
जाणून घे खास देवत्व त्यात’
पुढे महात्मा बसवेश्वर प्रतिपादन करतात:-
‘लाखांनी घडली मूर्ती ती पतळे, देवत्व कैसे अग्नीत वितळे,
गरजेनुसार जे जाती विकले, सांगा त्यांना का देव मानू?’
महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अलौकिक विचारधारेतून, जी ‘वचन’ रूपाने अवरतलीत, एका नव्या धर्मक्रांतीला जन्म दिला. धर्म हा जीवनात उतरला पाहिजे. धर्म म्हणजे जगण्याची आणि आचरण करण्याची पद्धत. आचारणाला महात्मा बसवेश्वर प्राधान्य देत. ‘चाले तैसा बोले’ याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.
No comments:
Post a Comment